एका सौन्दर्यपूर्ण टेकडीवर पर्यावरणाला कुठलीही बाधा येणार नाही अशा रीतीने विकसित केलेले सिडकोचे कलाग्राम येथे येणाऱ्याला विहंगम दृष्याचा आल्हाद देते. सी.बी.डी अर्थात मध्यवर्ती व्यावसायिक जिल्ह्याचा दर्जा लाभलेल्या बेलापूर नोडमधील अत्यंत मोक्याच्या जागी सेक्टर १५ मध्ये रेल्वे स्थानकाच्या समोर ४.७ हेक्टरवर हे कलाग्राम पसरले आहे. निसर्गरम्यतेमुळे हे स्थान विरंगुळ्यासाठी अत्यंत योग्य आहे. कला, खाद्यकृती आणि सांस्कृतिक उपक्रमांचे हे कायमस्वरूपी केंद्र झाले आहे. प्रदर्शन सभागृह, दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अँम्फीथिएटर यांचा यात समावेश होतो.

विविध राज्यांतील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हस्तकला व कलावस्तूंचे एक व्यापक प्रदर्शन व विक्री केंद्र बनले आहे. लोककलेची ही कायमस्वरूपी बाजारपेठ असून या उपक्रमाद्वारे लोककला-हस्तकलेच्या क्षेत्राला मदत होत आहे. कला आणि कलाउत्पादनांच्या व्यवसायाकरिता कलावंत व खरेदीदार यांच्यात समन्वयाचे हे महत्वपूर्ण असे स्थान आहे.

केंद्रीय वर्स्त्रोद्योग मंत्रालयाची सिडकोच्या या प्रकल्पाला मान्यता आहे. ग्रामीण कलावंताच्या विक्री प्रक्रियेतील अडत्यांना दूर करून वस्तूंच्या विक्रीसाठी महत्वाच्या जागी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या केंद्रीय धोरणास अनुसरून हे केंद्र उभारण्यात आले आहे. हातमाग आणि हस्तकला विकास आयुक्तांचे सानुग्रह अनुदान या प्रकल्पास लाभले आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास आयोग या प्रकल्पाचा समन्वयक आहे.