सुमारे १२ एकर परिसर व्यापलेल्या कलाग्राममधील १० एकरात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष असलेले जंगल पसरले आहे. निसर्ग सफारीचा आनंद घेण्यासाठी सिडकोने २०१६-१७ दरम्यान उंच वृक्षांमधून मार्ग काढणारी सुमारे ८०० मीटरची पाउल वाट बनवली. निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी तरुणांसाठी हे एक पर्वणी आहे. चिमणी, जंगली मैना, पोपट, सुतारपक्षी, बुलबुल, कोकीळ, खंड्या, कॉपरस्मिथ बार्बेट यासारख्या २० प्रजातींचे पक्षी येथे पहावयास मिळतात. सकाळी आणि सायंकाळी पक्षांचा किलबिलाट मनाला आल्हाद देतो.