दक्षताविषयी
सिडको प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सिडको संचालक मंडळ ठराव क्र. 10817 दि. 17 मे 2013 अन्वये सिडकोमध्ये दक्षता विभागाची स्थापना करण्यात आली असून मुख्य दक्षता अधिकारी म्हणून राज्य पोलीस दलातील अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी राज्य शासनातर्फे प्रति नियुक्तीवर पाठविण्यात येतात. दक्षता विभागाची कार्यप्रणाली व्दिस्तरीय आहे.
i) प्रतिबंधात्मक दक्षता आणि
ii) अन्वेषणात्मक दक्षता.
दक्षता विभागाकडून सिडकोमधील विविध विभागांना अकस्मात भेटी देऊन कर्मचाऱ्याची गुणवत्ता व त्यांची कर्तव्यातील सचोटीची पडताळणी केली जाते. त्यामध्ये कर्मचाऱ्याची कसूरी आढळल्यास त्यांच्या विरुध्द शिस्तभंग विषय कारवाई प्रस्तावित करण्यात येते.
सिडकोमधील भ्रष्टाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांमधील संबंधित कर्मचाऱ्यांविरुध्दच्या शिस्तभंग विषयक कारवाईवर पर्यवेक्षण ठेवतो तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सतत संपर्कात असतो.
सिडकोमध्ये भ्रष्टाचार मुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम दक्षता विभागाद्वारे राबविले जातात. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांव्दारे पथनाट्य सादर करुन भ्रष्टाचार मुक्तीचा सामाजिक संदेश पोहचविणे, शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धा आयोजित करून बाल वयातच भ्रष्टाचार मुक्तीचे संस्कार घालणे, सिडको कर्मचाऱ्यांमार्फत भ्रष्टाचारावरील लघु नाटिका सादर करुन सिडकोमध्ये भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश सिडको कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचविणे ईत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे.
नागरिकांनी सिडकोमधील गैरव्यवहाराबाबत निर्धास्तपणे ऑन लाईन किंवा व्यक्तीशः तक्रार करावी असे आवाहन मुख्य दक्षता अधिकारी यांनी केले आहे. तक्रारदाराने आपली ओळख गुप्त ठवण्याबाबत विनंती केल्यास दक्षता विभाग सदर गोपनीयता बाळगण्यास कटिबद्ध आहे.
मुख्य दक्षता अधिकारी हे पुढील 3 समित्यांचे सुद्धा प्रमुख आहेत.
1) लवाद समिती
2) कार्यकाल वाढ समिती आणि
3) जवाहरलाल नेहरू बंदर प्रभावक्षेत्र उच्च स्तरीय समिती.