कॉर्पोरेट पार्क

नवी मुंबईतील खारघर येथे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 140 हे. इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर सिडकोतर्फे कॉर्पोरेट पार्क प्रकल्प साकारण्यात येणार आहे. मुख्यत: वाणिज्यिक व अंशत:निवासी वापर असणारे आर्थिक केंद्र असे या प्रकल्पाचे वर्णन करता येईल. नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत करणे, हा कॉर्पोरेट पार्कच्या निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईमध्ये उद्योग केंद्र निर्माण होऊन घर ते कामाचे ठिकाण यांतील अंतर लक्षणीयरीत्या कमी होऊन नवी मुंबईकरांच्या दृष्टीने होम टू वर्क ही संकल्पनाही बऱ्याच अंशी साध्य करणे शक्य होणार आहे. कॉर्पोरेट आणि वित्तिय क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांना या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी नियोजन व संकल्पन प्रस्ताव विचाराधीन आहे.

प्रस्तावित कॉर्पोरेट पार्क हे प्रस्तावि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीकच्या अंतरावर असणार असून पायाभूत सुविधा, नामांकित शैक्षणिक संस्थांची शाळा व महाविद्यालये, रुग्णालये, हॉटेल, सेंट्रल पार्क व खारघर व्हॅली गोल्फ कोर्ससारख्या सांस्कृति सुविधांनी हा परिसर परिपूर्ण आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा असणाऱ्या कॉर्पोरेट पार्कमध्ये उच्च दर्जाचे जीवनमान व्यतित करण्याची अनुभूती मिळणार आहे.

कॉर्पोरेट पार्कसाठी प्रस्तावित असलेला भूखंड हा ग्रीनफिल्ड प्रकारातील व नियमित आकाराचा असून सद्यस्थितीत या भूखंडाकरिता कोणताही विशिष्ट प्रवेश मार्ग नाही.

कॉर्पोरेट पार्क प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी द्विस्तरीय जागतिक संकल्पन स्पर्धा राबविण्यात आली. पहिल्या स्तरात बोलीदारांची यादी तयार करणे व दुसऱ्या स्तरावर सर्वोत्कृष्ट संकल्पन प्रस्ताव निवडण्यासाठी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या बोलीदारांमध्ये संकल्पन स्पर्धा घेणे या प्रक्रिया समाविष्ट होत्या.

 

प्रमुख वैशिष्ट्ये : 

परिवहन जोडणी

  • शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीवर मात
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई विमानतळापासून अंदाजे 40 कि.मी. अंतरावर

प्रेरक (ग्रोथ ड्रायव्हर्स) 

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (नमुंआंवि) व एनएमएसईएसएस
  • प्रमुख एमआयडीसी क्षेत्रे 

परिवहन केंद्रीत विकास

  • प्रकल्पाचे नियोजन आणि संकल्पन आंतरराष्ट्रीय मानकांनुसार
  • मेट्रो मार्गामुळे सुलभ जोडणी व रस्ते वाहतुकीवर कमी ताण

पादचाऱ्यांसाठी सुविधा

  • पादचाऱ्यांना चालण्यासाठी आकर्षक मोकळ्या जागा
  • स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग जनांच्या सुरक्षेकरिता विविध सुविधा 

आधुनिक व शाश्वत विकास

खारघर कॉर्पोरेट पार्क प्रकल्पाचे विभाजन सहा भिन्न क्षेत्रांमध्ये करण्यात आले असून प्रत्येक क्षेत्र हे विशिष्ट उद्देशाकरिता प्रस्तावित आहे.

  • खारघर सिटी सेंटर 
  • सेंट्रल पार्क इस्टेट 
  • कॉर्पोरेट कॅम्पस , इनोव्हेशन हब
  • बिझनेस हब  खारघर 
  • लाइफस्टाइल इस्टेट

 

उलवे मार्ग

सिडकोतर्पे नवी मुंबईतील उलवे नोड्मध्ये प्रस्तावित असलेला हा मार्ग भविष्यातील वाढत्या वाहतुकीच्या गरजांचा विचार करून साकारण्यात येणार आहे. अत्याधुनिक निगराणी प्रणालीवर आधारित हा मार्ग विकसित करण्यात येणार आहे.

प्रस्तावित मार्ग हा सहा पदरी दुतर्फा मार्ग असून जेएनपीटी (बेलपाडा) येथून सुरू होणारा हा मार्ग  पुढे जासई टेकड्यांच्या पायथ्याशी शिवाजी नगर येथील प्रस्तावित एमटीएचएल मार्गास मिळून उलवे किनारपट्टीवरून जाईल. पनवेल खाडीवरील आम्र मार्ग हा या मार्गाचा शेवटचा टप्पा असेल.

दोन टप्प्यांमध्ये विकसित करण्यात येणार हा मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) व प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळ जोड मार्गासह आम्र मार्ग जंक्शन ते शिवाजीनगर येथील एमटीएचएल पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात शिवाजीनगर ते जेएनपीटीपर्यंत (बेलपाडा) सदर मार्ग विकसित करण्यात येईल. एकूण 10.106 कि.मी. लांबीचा हा मार्ग पहिल्या टप्प्यात 1.2 कि.मी. च्या विमानतळ जोड मार्गासह 5.8 कि.मी. याप्रमाणे विकसित करण्यात येणार आहे.

सदर प्रकल्पांतर्गत याकरीता नोडल रोड जंक्शन येथे 03 उड्डाण पूल व 1.2 किमी आणि 0.6 किमीचे दोन आरसीसी स्टिल्ट पूल बांधणे नियोजित आहे. प्रस्तावित मार्गावर जंक्शन/पूर्वनियोजित ठिकाणी इन्टेलिजन्ट ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमसह आरसीसी व्हाया डक्ट सेवेचीही तरतूद करण्यात आली आहे. विविध नोड्समधील वाहतुकीचा विचार करता मुख्य रस्त्यालगत सर्व्हिस रोडही प्रस्तावित आहे. यामुळे एमटीएचएल ते विमानतळ दरम्यानची वाहतूक सुरळीतपणे चालेल. विमानतळ जोड मार्ग तरघर रेल्वे स्थानक येथून सुरू होऊन नेरूळ-उरण रेल्वे मार्ग आणि आम्र मार्ग यांवरून विमानतळास जोडला जाईल. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण आणि केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय यांच्याकडून सीआरझेडविषयक मंजुरी मिळालेला हा प्रकल्प  पूर्णत: पर्यावरण स्नेही आहे. सीआरझेडविषयक मंजुरी जून 2017 मध्ये मिळाली असून महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे त्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

खारघर-बेलापूर मार्ग

सिडको संचालक मंडळातर्फे 9.5 कि.मी. लांबीच्या व रु. 272.64 कोटी अंदाजित खर्च असलेला खारघर-बेलापूर मार्ग विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गाचा पहिला भाग खारघर, जलमार्ग, सेक्टर 16 ते सीबीडी बेलापूर, सेक्टर 11 पर्यंत विकसित करणे प्रस्तावित आहे. तर दुसरा भाग सीबीडी बेलापूर, सेक्टर 15 ते नेरूळ येथील जल वाहतूक टर्मिनलपर्यंत विकसित केला जाणार आहे. एकूण 9.5 कि.मी. लांबीच्या मार्गाचा प्रथम भाग 5 कि.मी. चा असून या भागात सायन-पनवेल महामार्गावर पूलदेखील बांधण्यात येणार आहे. सदर रस्ता व पुलाची रूंदी 30 मी. असणार आहे. उर्वरित रस्ता 4.50 कि.मी. चा असून त्यातील 1874.00 मी. रस्त्याचा विकास दुसऱ्या भागात करण्यात येणार आहे. दुसऱ्या भागातील 1874.00 मी. चा मार्ग वगळता उर्वरित मार्गाचा विकास यापूर्वीच करण्यात आलेला आहे.

नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यातील खारघर, कामोठे, नवीन पनवेल, उलवे व द्रोणागिरी या नोड्समधील विविध प्रकल्पांचा विकास सिडकोमार्फत करण्यात येत आहे. यातील केवळ खारघरमध्येच सिडकोतर्फे अनेक गृहनिर्माण योजना, कॉर्पोरेट पार्क, मेट्रो यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सिडकोने सेंट्रल पार्क व गोल्फ कोर्ससारखे आयकॉनिक प्रकल्प खारघरमध्ये साकारले आहेत. अशा परिपूर्ण खारघर नोडमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश मार्ग व कोपरा गाव असे केवळ दोनच ‘एन्ट्री पॉईंट्स’ आहेत. परंतु या ठिकाणीदेखील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून खारघर-बेलापूर मार्ग उपयुक्त ठरणार आहे.

बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभीकरण

नवी मुंबईतील एकमेव ऐतिहासिक वास्तू म्हणून ज्ञात असलेला बेलापूर किल्ल्याचा इतिहास इसवी सनाच्या 16 व्या शतकापर्यंत मागे जातो. जंजिऱ्याच्या सिद्दींनी बांधलेला हा किल्ला 1582 मध्ये पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. एकेकाळी 5 बुरुज व भक्कम तटबंदी असलेला हा किल्ला सध्या अवशेष रूपात शिल्लक आहे. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे व सध्या शिल्लक असलेल्या अवशेषांचे जतन करावे या उद्देशाने सिडकोतर्फे बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत बेलापूर किल्ल्याचे संवर्धन व सुशोभिकरण करून किल्ला व किल्ल्याभोवतालचा परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

संवर्धन व सुशोभिकरण उपक्रम

सद्यपरिस्थितीत सिडकोच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्याचे क्षेत्र 5 एकर आहे. सदर उपक्रमा अंतर्गत बेलापूर किल्ल्यास पर्यटन स्थळ तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या संवर्धनबरोबरच तेथील जैवविविधता जपण्यासाठी एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून किल्ला व परिसराचा विकास करण्यात येणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या किल्ल्याच्या अवशेषांचे जतन व संवर्धन करून तेथे चार शतकांचा रोमांचकारी इतिहास जागवला जाईल. नवीन बांधकाम करतेवेळी तत्कालिन बांधकाम सामुग्री व बांधकाम शैलीचा वापर केल्याने पर्यटकांना ऐतिहासिक काळात गेल्याचा अनुभव घेता येणार आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असा स्वागत कक्ष (एन्ट्रन्स प्लाझा) बांधण्यात येईल. तिकीट घर, विश्रांती स्थळ, शॉपिंग इ. सुविधा या प्लाझामध्ये असतील. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी तसेच किल्ल्याच्या आत फिरण्यासाठी वक्राकार पायरी मार्ग व हलक्या चढाची पायवाट (रॅम्प) तयार करण्यात येणार आहेत. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी बॅटरीचलित वाहनही उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच वाहनतळ, उपहारगृहे, विश्रांती स्थळे, स्वच्छतागृहे, पॅव्हेलियन, टेहेळणी बुरुज (वॉच टॉवर्स) या सुविधाही विकसित करण्यात येणार आहेत. किल्ल्यातील बुरुजांच्या पार्श्वभूमीवर ॲम्फी थिएटर व खुला रंगमंच या नावीन्यपूर्ण संकल्पानाही राबविण्यात येणार आहेत. या सुविधा सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम, शैक्षणिक प्रकल्प व सहली, शिबिरे यांचे आयोजन करण्यास पूरक ठरणार आहेत. ध्वनी-प्रकाश योजनेवर आधारित, किल्ल्याची माहिती सांगणारा कार्यक्रमही सादर केला जाणार आहे. मुंबईच्या आरमारी व सागरी इतिहासाबद्दल माहिती देणारे वस्तुसंग्रहालय आणि प्रदर्शन केंद्रही येथे प्रस्तावित आहे.  किल्ल्याभोवतालच्या परिसरात छोटेखानी उद्यान व कारंजे उभारण्यात येणार आहे. संवर्धन व सुशोभिकरण उपक्रमाकरिता रु. 17 लक्ष इतका खर्च अंदाजित आहे.

मरीना आणि वॉटर फ्रंट

केरळमधील कोची इंटरनॅशनलच्या धरतीवर सीबीडी बेलापूर येथील सेक्टर क्र. 11, 14 आणि 15 येथे मरीना प्रकल्प अर्थात सुसज्ज बंदर विकसित करण्यात येणार आहे. एकूण 5 एकर जमिनीपैकी 3 एकरवर मरीना प्रकल्प व 2 एकरवर वॉटर फ्रंट विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जल वाहतुकीला प्रोत्साहन देऊन सार्वजनिक वाहतुकीच्या अन्य साधनांवरील तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या गेटवे ऑफ इंडियासारख्या बंदरांवरील ताण कमी करणे हा आहे. या प्रकल्पा अंतर्गत उद्यान, ॲम्फी थिएटर, मॅंग्रोव्ह वॉक, फुड प्लाझा, बोट राइड, गाझेबो इ. सुविधाही विकसित करण्यात येणार आहेत.

जल वाहतूक टर्मिनल, नेरूळ

नवी मुंबईतील अंतर्गत तसेच नवी मुंबई व मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी सिडकोतर्फे प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांतर्गत नवी मुंबईतील नेरूळ येथे जल वाहतूक टर्मिनल प्रस्तावित आहे. जल वाहतुकीचा पर्याय हा पर्यावरणपूरक व कमी खर्चिक असण्याबरोबरच तुलनेने कमी कालावधीत विकसित करता येण्यासारखा, मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करण्यास सक्षम असणारा असा आहे. सदर जल वाहतूक टर्मिनल विकसित केल्यानंतर नवी मुंबई ते मुंबई आणि नवी मुंबई ते कोकण यांदरम्यान बोट सेवा सुरू होऊन प्रवासाचा कालावधी एक ते दीड तासाने कमी होणार आहे. 

सांस्कृतिक संकुल, खारघर

सिडकोने नवी मुंबई विकसित करताना मानवाच्या भौतिक गरजांप्रमाणे कला-क्रीडा व सांस्कृतिक गरजांचाही विचार करून सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, कलाग्राम (अर्बन हाट), विष्णुदास भावे नाट्यगृह इ. प्रकल्प विकिसत केले. उत्सव चौक, खारघर नजीकच्या 2 हेक्टर परिसरात प्रस्तावित असलेले सांस्कृतिक संकुल हे पॅरिस येथील लुव्र म्युझियम आणि लंडन येथील ब्रिटिश म्युझियम यांच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. सदर सांस्कृतिक संकुला अंतर्गत कला दालन, वस्तुसंग्रहालय आणि कला केंद्र यांचा समावेश आहे. सांस्कृतिक संकुलामुळे नवी मुंबईचे सांस्कृतिक विश्व अधिक समृद्ध होण्यास मदत होण्याबरोबरच जगाच्या सांस्कृतिक नकाशावरही नवी मुंबईला मानाचे स्थान प्राप्त होणार आहे.