शहराची सीमा
नवी मुंबईचे ३४४ चौरस किलोमीटर परिक्षेत्र पूर्वेला काळुंद्रे गावापासून सुरू होते, पश्चिमेस दिघ्यापासून सुरू होणारी तळोजापर्यंतची डोंगररांग; उत्तरेला दिघा गाव तर दक्षिणेस चाणजे गाव, तर दक्षिण-पूर्वेला द्रोणागिरी असा हा विस्तार आहे. रायगड व ठाणे जिल्ह्यातील ९५ गावांचा त्यात समावेश आहे. राज्य शासनाने ४ फेब्रुवारी १९७० मध्ये नवी मुंबई क्षेत्रातील ८६ गावांतील १५९.५४ चौ.कि. क्षेत्रफळाच्या भूसंपादनाची अधिसूचना जाहीर केली. ऑगस्ट १९७३ मध्ये ९ गावांतील २८.७० चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा यात अंतर्भाव करण्यात आला. नवी मुंबई प्रकल्प क्षेत्रात १६६ चौ.कि.मी. खाजगी क्षेत्र, २७ चौ.कि.मी. मिठागर क्षेत्र, आणि १०१ चौ.कि.मी शासकीय क्षेत्राचा समावेश आहे. या शहराचा परिसर उत्तर कोकणाचा भाग आहे. यातील बहुतांश भूप्रदेश दलदलीचा असून येथे मोठ्या प्रमाणात मिठागरे होती. येथूनच देशभरातच नव्हे तर जगभरतील कित्येक देशात मिठाचा पुरवठा होत असे
हवामान
भौगोलिक स्थिती: पूर्वेकडील पारसिक टेकड्यांची उंच-सखलता उत्तर-दक्षिण दिशेला पसरली आहे. पारसिक टेकडी आणि ठाणे खाडी यामधील अरूंद भूक्षेत्र हे रुंदीला २ किलोमीटर इतके असून तो पट्टा लांबीला २० किलोमीटर आहे. एकूण २,५६० हेक्टर जमीन त्याने व्यापली आहे. उत्तरेला दिघ्यापासून ते दक्षिणेला बेलापूरपर्यंत हा परिसर पसरला आहे.
भूविज्ञान: येथील टेकट्यांची रचना ही दख्खनच्या बसाल्ट खडकापासून, त्याचप्रमाणे ग्रेनाइट, नाइस आणि तांबड्या लॅटेराइट म्हणजेच जांभ्या खडकांची आहे. अधेमधे हलकी उतरती किनाऱ्याकडील जमीन आहे जिला खोलवर जांभ्या खडकाचे आच्छादन आहे तर काही ठिकाणी जारण होऊन तिला पिवळ्या मुरूमाचे रूप आले आहे. टेकड्यांच्या हलक्या उतारांवरील जमीन ही जांभ्या दगडातून सुटलेली लाल भुसभुशीत आणि पाण्याने खारवटलेली आहे. चिकणमाती आणि मध्यम क्षार मात्रा (<७५%) व माफक प्रमाणात आम्लीय (पीएच पातळी ५ ते ६.५) असलेली आहे.
तापमान
येथील सामान्य तापमान २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे असते. एप्रिल-मे दरम्यानच्या काळात ते किमान ३० ते ३३ अंश सेल्सियसच्या आसपास असते तसेच हिवाळ्यात १६ ते २० अंश सेल्सियस एवढे असते. उन्हाळ्यात ३९ अंश सेल्सियस एवढा उच्चांक तर हिवाळ्यात १४ अंश सेल्सियस इतकाही निच्चांक नोंदविला गेला आहे.
पर्जन्यमान
नवी मुंबईत वर्षाला सरासरी २५०० ते ३००० मि.मि. पाउस पडतो. पाणलोट क्षेत्र विचारात घेता हे प्रमाण ५००० मि.मि. इतके होते. जून ते ऑक्टोबर दरम्यानच्या ६० ते ७० दिवसात जवळ-जवळ ८० टक्के पाउस पडतो. त्यामुळे इथल्या परिसरात आर्द्रता ४१ ते ९७ टक्के एवढी असते.
विकास आराखडा
एका स्वयंपूर्ण महानगराची, शहराची निर्मिती करून, नागरिकांच्या राहणीमानात सर्वांगीण सुधारणा करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून नवी मुंबई प्रकल्पाकरिता सिडकोने बृहद आराखडा (मास्टर प्लान) मसुदा तयार केला तो १० ऑक्टोबर १९७५ रोजी राज्य शासनाला सादर करण्यात आला व ऑगस्ट १९७९ मध्ये शासनाने त्यास मान्यता दिली. सुमारे २ दशलक्ष लोकसंख्येचे नियोजन त्यात असले तरी ३ ते ४ दशलक्ष लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता या शहरात आहे. कालानुरूप या आराखड्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. मंजूर विकास आराखड्यामध्ये रहिवासी, वाणिज्यिक, संस्थात्मक, औद्योगिक, क्षेत्रीय बाग बगीचे, विना विकसित क्षेत्र यांसारख्या विविध भूवापर क्षेत्रांचा विचार करण्यात आला.
या विकास आराखड्यात २० नगरे असलेल्या बहुकेंद्री शहराची संकल्पना मांडली होती. व्यवसायाभिमुख मध्यवर्ती जिल्ह्याला ही सर्व नगरे जोडलेले असतील हे या नियोजनाचे मुख्य सूत्र होते. मुंबईच्या व्यवसायाभिमुख जिल्ह्यापेक्षा २० पट मोठे क्षेत्र त्यासाठी बेलापूर या मध्यवर्ती नगरात निर्धारित केले होते ज्यात राज्य व केंद्र सरकारची कार्यालये, बँका तसेच मोठ्या कंपन्यांची कार्यालये प्रस्तावित होती.
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बनविलेला ठाणे खाडीवरला मुंबईचे उत्तरेकडील टोक वाशी या नवी मुंबईच्या त्यावेळच्या गावाला जोडणारा पूल १९७२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला आणि नवी मुंबईतल्या विकासाला चालना मिळाली. नवी मुंबईच्या विकासाचा प्रारंभ वाशीपासून सुरु झाला. विकासासाठी हाती घेण्यात आले ते बेलापूर नगर. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा पनवेल खाडी पूल प्रथम बांधण्यात आला. त्यानंतर कोकण विभागीय आयुक्तालय असलेले कोकण भवन येथे उभारण्यात आले.
ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ आणि बेलापूर अशी ७ नगरे उत्तरेस तर खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल, उलवे, द्रोणागिरी व पुष्पक ही दक्षिणेकडील ७ नगरे अशी १४ नगरे सुधारीत आराखड्यानुसार वसविण्यात आली. आज उत्तरेस नवी मुंबई महानगरपालिका तर दक्षिणेस पनवेल महानगरपालिका स्थापन झाली आहे.
भौतिक सुविधा
पाणी पुरवठा
सिडकोने नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्याकरिता चार लक्ष मीटर्स लांबीचे जलवाहिन्यांचे जाळे विकसित केले आहे. भौतिक सेवा-सुविधांच्या अंदाजपत्रातील १२% रकमेची तरतूद नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्याकरिता करण्यात येते. प्रत्येक नोडसाठी स्वतंत्र प्रभाग करण्यात आला आहे.
एकूण क्षमता ३२५ एमएलडी असून सध्याच्या नवी मुंबईच्या असलेल्या गरजेच्या तुलनेत जास्तच आहे.
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची क्षमत पुढील प्रमाणे आहे.
१. ४५० एमएलडी क्षमतेचे मोरबे धरण
२. ३५० एमएलडी क्षमतेचे हेटवणे धरण
३. ३५० एमएलडी जलक्षमतेचा बाळगंगा धरण प्रकल्प
४. अन्य जलस्त्रोत: एमआयडीसी (७५ एमएलडी नवी मुंबई महानगर पालिकेद्वारे पाण्याचा वापर) आणि एमजीपी (६५ एमएलडी पाणी सिडकोमार्फत पनवेल आणि कळंबोलीला पाणी पुरवठा)
पर्जन्यजल निचरा व्यवस्थापन
नवी मुंबईस भरतीच्या काळात गंभीर पूरपरिस्थितीस सामोरे जावे लागेल याचे भान राखून सिडकोने नवी मुंबईत एक आगळी-वेगळी पर्जन्यजल निचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. संपूर्ण कोकण परिसरातील हे एक वैशिष्ट्य ठरले आहे. या पद्धतीत धारण तलाव (३८) आणि साठवण तलाव (०२) असे ४० जलाशय विकसित करण्यात आले. पावसाचे पाणी या तळ्यांत वळविले गेले आहे. तळ्याभोवतालचा परिसर सुशोभित करून त्याचे विरंगुळ्याच्या स्थानात रुपांतर करण्यात आले आहे. एकूण ६०९.५७ हेक्टरचा परिसर या तलावांखाली आला आहे. या व्यवस्थापन यंत्रणेचे सुपरिणाम २००५ सालच्या ढग फुटीच्या वेळी प्रत्ययास आले. मुंबईसह संपूर्ण ७२० कि.मीटरचा कोकण किनारा पाण्याखाली गेला असताना नवी मुंबईवर त्याचा अत्यल्प परिणाम झाला.
मलनिस्सारण व सांडपाणी
पर्जन्यजल निचरा व्यवस्थापन
नवी मुंबईत दरवर्षी होणारा २५०० ते ३००० मी.मी. पाऊस आणि या शहराचा २०% सखल भूप्रदेश यांचे नियोजन योग्यरीत्या झाले नाही, तर नवी मुंबईस भरतीच्या काळात गंभीर पूरपरिस्थितीस सामोरे जावे लागेल याचे भान राखून आणि संपूर्ण शहराची पुनःभरणी करणे हे पर्यावरण आणि आर्थिक दृष्ट्या शक्य होणार नाही हे लक्ष्यात घेउन सिडकोने एक आगळी-वेगळी पर्जन्यजल निचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. संपूर्ण कोकण परिसरातील हे एक वैशिष्ट्य ठरले आहे.
या पद्धतीत विकसित भागातील पावसाचे सांडपाणी एका तळ्यात वळविले गेले. या तळ्यात सभोवतालचे सांडपाणी एकाच वाटेने आत सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. तसेच तळ्याच्या आत दोन भिंती बांधण्यात आल्या. यामुळे नदीचे पाणी एका ठराविक पातळीच्या वर गेल्यावर ते रोखले जाते.
साठवण तलाव
समतल तळ / जमीन असलेला हा जलाशय सांडपाणी वाहून नेणा-या नाल्यांचाच विस्तार असतो. त्याच्या कडांना पाणी सोडण्याची व्यवस्था म्हणून दारे तयार केलेली आसतात. या प्रणालीचा माध्यमातून उंचावर असलेल्या औद्योगिक क्षेत्राचे पाणी खाडीमध्ये सोडले जाते. पाण्याचा निचरा करणा-या व्यवस्थेत येणा-या भौगोलिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी या प्रणालीत उच्च भरतीच्या स्तराखालून जाणार कमी स्तराचा नाला बनविला जातो. जो हॉल्डिंग पॉड्शी जोडला जातो. वरच्या स्थरावरील नाला नव्याने विकसित झालेल्या नागरी विभागातून स्वतंत्रपणे पुराच्या पाण्यास प्रवाहित करतो.
मध्यवर्ती जलनिचरा स्रोत
सीबीडी बेलापूर 'आर्टीस्ट विलेज' येथील वसाहतीच्यामध्यातून जाणारा व पावसाचे पाणी वाहून नेणारा नाला पाणी वाहण्याकरिता लागणारा उतार आणि जमिनीची वरची व खालची पातळी यांतील फरक यांच्या आधारावर तयार करण्यात आला. याकरिता १६ हेक्टर क्षेत्रफळाचे तळे तयार करण्यात आले ज्यामुळे ३०% सांडपाणी रोखता आले. हे क्षेत्र उत्खनन तसेच बंधारा उभारून तयार करण्यात आले, तसेच पाण्याच्या आवश्यक तेवढ्याच निर्गमनाची व्यवस्था करण्यात आली.
विद्युत पुरवठा सुविधा
सिडकोने विद्युत पुरवठा प्रणालीचे स्वतंत्र जाळे तयार केले आहे. विविध स्त्रोतांद्वारे नवी मुंबईच्या विजेची आवश्यकता पूर्ण केली जात आहे.विद्युत जोडणीच्या सुलभ प्रणालीकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मार्यादित यांच्याबरोबर सिडकोने सहकार्य केले आहे. सिडकोच्या देखरेखीखाली असणाऱ्या रेल्वे प्रकल्पातील विद्युत आणि यांत्रिक उपकरणे यांना अव्याहत विद्युत पुरवठा होत राहावा यासाठी 'निरीक्षणात्मक नियंत्रण आणि माहिती संपादन प्रणाली' (स्काडा) विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक नोडमध्ये पथदिव्यांची योजना प्रणाली, पिण्याच्या पाण्याचा उपसा केंद्र, मलनिःसारण आणि भरतीच्या पाण्याचा उपसा करणारी केंद्र, वाणिज्यिक आणि निवासी संकुले यांना सुरळीत विद्युत पुरवठा केलं जात आहे. शहराच्या विकास आराखड्यात विद्युत संयंत्रे उपस्थानके आणि दुहेरी खांबांचा आराखडाही सिडकोने तयार केला आहे. अतिउच्च आणि कमी दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण करणे यांचाही समावेश शहर विद्युत सुविधा नियोजनात करण्यात आला आहे.
दळणवळण सुविधा
रस्ते आणि पुल
नवी मुंबईतील दळणवळण व्यवस्थेचे नियोजन करताना सुकर प्रवास हाच कळीचा मुद्दा सिडकोने अधोरेखित केला. दळणवळण यंत्रणेत रस्त्यांच्या अधिश्रेणीनुसार नागरी द्रुतगतीमार्ग, जोडरस्ते, मुख्य रस्ते, जोडरस्ते आणि स्थानिक रस्ते अशी रचना करण्यात आली. शहराच्या सर्वसमावेशक दळणवळण यंत्रणेत रेल्वे, रेल्वे, आणि हवाई वाहतुक यांचा समावेश करण्यात आला.
विनाव्यत्यय रहदारीसाठी सिडकोने नवी मुंबईत ६५०-कि.मि. लांबीचे रस्ते विकसित केले आहेत. यात ५ प्रधान पूल, ८ उड्डाण पूल, १५ मध्यम आकाराचे पूल तसेच अनेक पादचारी पुल अशी वाहतुक यंत्रणा नवी मुंबईत विकसित करण्यात आली आहे. नवी मुंबईमधील प्रमुख उड्डाणपुलांमध्ये मानखुर्द-बेलापूर रेल्वे मार्गावरील ठाणे खाडी पूल, बेलापूर-पनवेल मार्गावरील तळोजा खाडीपूल आणि जुई खाडीपूल, ठाणे-वाशी-नेरूळ मार्गावरील ठाणे खाडीपूल, नेरूळ-सीवूड्स-बेलापूर-उरण रेल्वे मार्गावरील पनवेल खाडीपूल, मोहा खाडीपूल, आणि ऐरोली खाडीपूल यांचा समावेश आहे.
रेल्वे यंत्रणा
नवी मुंबईची जीवनवाहिनी म्हणून रेल्वे सुविधा नवी मुंबईचे अभिसरण सांभाळते. भारतीय रेल्वे आणि एक कंपनी, सिडको यांच्या भागीदारीने स्वातंत्र्योत्तर भारतात रेल्वे यंत्रणेच संयुक्त प्रकल्प साकारला जाण्याचे नवी मुंबई हे अद्वितीय उदाहरण आहे. सामंजस्य करारानुसार सिडकोने ६७% भागभांडवलाची गुंतवणूक केली. तर उर्वरित ३३% भागभांडवल रेल्वेने उभारले आहे. नवी मुंबईतील रेल्वे यंत्रणा आदर्शवत मानली जाते ती तिच्या नियोजनबद्ध प्रवासी-सुलभ रचनेमुळे. प्रत्येक रेल्वे स्थानक सहज चालत जाता येईल एवढ्या जवळच्या अंतरावर आहे. रेल्वे मार्गाच्या अदलाबदलीसाठी सुलभ पर्याय, प्रत्येक स्थानकावर दुहेरी फलाटांची योजना ही नवी मुंबई उपनगरीय रेल्वेची वैशिष्ट्ये सांगता येतील. नवी मुंबईत सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावर २०० कि. मीटर लांबीचे ६ रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. त्यात ३० स्थानकांचा समावेश आहे.
वाशी-पनवेल आणि वाशी-ठाणे या मार्गिकांवरील सर्व स्थानकांची संरचना परस्परांहून भिन्न आहे. प्रत्येक स्थानकाबाहेर पुरेशी मोकळी जागा सोडण्यात आली आहे ज्यामुळे बहुविध प्रवासी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अनेक स्थानकावरील चटईक्षेत्राचा व्यावसाईक उपयोग करून घेण्यात आला आहे. नवी मुंबईतील रेल्वे मार्ग पुढील प्रमाणे आहेत.
१. मानखुर्द-बेलापूर-पनवेल (पूर्णतः कार्यरत)
२. ठाणे-तुर्भे-नेरूळ/वाशी (पूर्णतः कार्यरत)
३. बेलापूर/ नेरूळ-उरण (अंशतः कार्यरत)
४. पनवेल-उरण (प्रस्तावित
मानखुर्द-बेलापूर-पनवेल रेल्वे मार्ग
९ मे १९९२ रोजी मान. राष्ट्रपती श्री. आर. वेंकटरामन यांनी मानखुर्द-वाशी रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखविला आणि सिडकोने नवी मुंबई विकास पर्वातील नवा अध्याय लिहीला. या दिवसापर्यंत हार्बर रेल्वे मार्गिकेचे शेवटचे टोक होते मानखुर्द स्थानक. याबरोबरच ठाणे खाडी रेल्वे पूलही सुरु झाला आणि सिडको व रेल्वे मंत्रालयाने संयुक्तरीत्या बांधलेल्या या पुलाने मुंबई नवी मुंबईशी जोडली गेली. मानखुर्द-बेलापूर-पनवेल या २९ कि.मी. लांबीच्या मार्गिकेवर एकूण ९ स्थानके आहेत. मानखुर्द-पनवेल रेल्वे मार्ग हा नवी मुंबईला मुंबईशी जोडतो. हा मार्ग टप्प्या-टप्प्याने विकसित झाला आहे. मे १९९२ पर्यंत हा फक्त वाशीपर्यंत कार्यान्वित होता पुढे फेब्रुवारी १९९३ मध्ये ही मार्गिका नेरूळपर्यंत, जुन १९९३ मध्ये बेलापूरपर्यंत तर पुढे २९ जून १९९८ मध्ये पनवेलपर्यंत जोडली गेली. प्रारंभी सी.एस.टी-पनवेल दरम्यान असलेली एकेरी वाहतूक पुढे एप्रिल २००० पासून दुहेरी करण्यात आली. नवी मुंबई विकासातील रेल्वे हा मुख्य घटक आहे.
ठाणे-तुर्भे-नेरूळ/ वाशी रेल्वे मार्ग
सुमारे २३ कि.मी लांबीचा ठाणे-तुर्भे-नेरूळ/वाशी रेल्वे मार्ग नवी मुंबईला ठाणे शहराशी जोडतो; वाहतुकीच्या गर्दीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी या मार्गिकेची निवड करण्यात आली. हा मार्ग ९ नोव्हेंबर २००१ रोजी रेल्वे मंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांच्याहस्ते कार्यान्वित झाला.
बेलापूर/ नेरूळ-सीवूड्स-उरण रेल्वे मार्ग
नवी मुंबईतील विस्तारित ट्रान्स हार्बर उपनगरीय रेल्वेच्या सीवूड्स/नेरूळ-खारकोपर मार्गिकेचे उद्घाटन ११ नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रेल्वे मंत्री श्री. पियुष गोयल, खासदार आणि राज्याचे मंत्री हेही उपस्थित होते. या मार्गावरील सेवा १२ नोव्हेंबर २०१८ पासून नियमितपणे सुरु झाली. एकूण २७ कि.मी. लांबी व १० रेल्वे स्थानके असलेल्या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात ५ स्थानके असून ती उलवे, बेलापूर व नेरूळ नोड्सना जोडत असून तिची लांबी १२ कि. मी. आहे. दुसऱ्या टप्प्यात ही मार्गिका उरणपर्यंत जाणार असून त्यात आणखी ५ स्थानकांचा समावेश होईल.
गृहनिर्माण योजना
नगर नियोजन व विकास क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था, याबरोबरच नवी मुंबई क्षेत्रात सातत्याने समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी दर्जेदार घरांची निर्मिती करणारे नियोजन प्राधिकरण असाही सिडकोचा लौकिक आहे. नवी मुंबईसारखे जागतिक दर्जाचे शहर विकसित करण्याबरोबरच सिडकोने या शहरात राज्यातील व देशाच्या अन्य भागांतील लोकांना वास्तव्य करण्याची संधी मिळावी म्हणून नवी मुंबईमध्ये आजपर्यंत विविध गृहनिर्माण योजना राबविल्या आहेत. सिडको महामंडळाने आपले गृहनिर्माण धोरण आखताना त्यामध्ये स्व-वित्त पुरवठा तत्त्व अंतर्भूत करून जमिनीचा मुख्यत्वे वापर हा समाजाच्या विविध घटकांकडून असलेल्या घरांची वाढती मागणी पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट समोर ठेवून सिडकोने आजवर नवी मुंबई क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांकरिता अनेक गृहनिर्माण योजना राबविल्या आहेत. या सर्व गृहनिर्माण योजनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून या योजना कमालीच्या यशस्वी ठरल्या.
सिडकोने आजवर बांधलेल्या 1,23,577 घरांपैकी 51% घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अल्प उत्पन्न गटासाठी, 26% घरे ही मध्यम उत्पन्न गटासाठी तर 23% घरे ही उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात आली आहेत. या आकडेवारीवरून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देणे हेच सिडकोच्या गृहनिर्माण धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे दिसून येते.
सिडकोतर्फे 1972 पासून राबविण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनांतर्गत घरे बांधताना तत्कालिन उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. सुरुवातीच्या बांधकामांमध्ये लोड बेअरिंग कॉम्पोझिट मॅझनरीसह ब्रिक वक्र आणि आरसीसी म्युलीयन तंत्रज्ञान व त्यानंतर नव्याने उदयास आलेल्या प्रिफॅब चॅनल स्लॅब, 3-एस सिपोरेक्स सिस्टीम, भूकंपरोधक तंत्रज्ञान इ. तंत्रज्ञानाचा वापर सिडकोने आपल्या बांधकामांमध्ये केला.
सिडकोने बॉम्बे अर्बन डेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट (बीयुडीपी) 1, 2 आणि 3 अंतर्गत ऐरोली, कोपरखैरणे, खारघर, नेरूळ, कळंबोली आणि नवीन पनवेल येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता घरे बांधली. विविध उत्पन्न गटांकरिता सिडकोतर्फे राबविण्यात आलेल्या काही प्रमुख गृहनिर्माण योजना पुढील प्रमाणे :
- आर्टिस्ट व्हिलेज
- सीवूड्स इस्टेट
- मिलेनिअम टॉवर्स
- घरकुल
- स्पाघेटी
- घरौंदा
- निवारा
- सिम्प्लेक्स
- वास्तुविहार व सेलिब्रेशन
- उन्नती
- व्हॅलीशिल्प
- स्वप्नपूर्ती
15 हजार घरांची गृहनिर्माण योजना
या गृहनिर्माण योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांसाठी एकूण 14,838 घरे उपलब्ध करून देण्यात आली. त्यांपैकी 5262 घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर 9576 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही घरे 1 बीएचके (1 हॉल, 1 खोली, 1 स्वयंपाकघर) प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र निर्देशांक 25.81 चौ.मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र निर्देशांक 29.82 चौ.मी. इतका आहे. या गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 नोड्मध्ये गृहसंकुले साकारण्यात येत आहेत. उच्च दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या या गृहसंकुलांना भारतीय शास्त्रीय संगीतातील रांगांची नावे देण्याची अभिनव कल्पना राबविण्यात आली आहे.
95 हजार घरांची महागृहनिर्माण योजना
सिडकोतर्फे 95,000 घरांच्या भव्य गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येऊन या महागृहनिर्माण योजनेचा भूमिपूजन समारंभ दि. 18 डिसेंबर, 2018 रोजी मा. पंतप्रधनांच्या शुभहस्ते पार पडला. सदर गृहनिर्माण योजना ही ‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित आहे. या गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा नोड्सह विविध नोड्मधील बस डेपो, ट्रक टर्मिनल, रेल्वे स्थानक फोरकोर्ट एरिया परिसरामध्ये घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर गृहनिर्माण योजना ही एकूण 4 पॅकेजमध्ये साकारण्यात येणार आहे. पॅकेज-1 अंतर्गत तळोजा नोड्मधील सेक्टर-29, 31, 28ए, 36ए, 37 आणि पनवेल आंतरराज्य बस टर्मिनल परिसरात घरे बांधण्यात येणार आहेत. या पॅकेज अंतर्गत एकूण 20448 घरे प्रस्तावित आहेत. पॅकेज-2 अंतर्गत पनवेल बस टर्मिनल, खारघर बस टर्मिनल, कळंबोली बस डेपो, खारघर बस डेपो, वाशी ट्रक टर्मिनल, खारघर रेल्वे स्थानक आणि सेक्टर-44, खारघर येथे घरे बांधण्यात येणार आहेत. पॅकेज-2 अंतर्गत एकूण 21,564 घरे प्रस्तावित आहेत. पॅकेज-3 अंतर्गत सानपाडा रेल्वे स्थानक (नोड्ल बाजू), सानपाडा रेल्वे स्थानक (महामार्गकडील बाजू), जुईनगर रेल्वे स्थानक, मानसरोवर रेल्वे स्थानक, खांदेश्वर रेल्वे स्थानक, खांदेश्वर (खाडीकडील बाजू) आणि सेक्टर-1ए, तळोजा येथे एकूण 21,517 घरे बांधणे प्रस्तावित आहे. पॅकेज-4 अंतर्गत बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर रेल्वे स्थानक पूर्व व पश्चिम आणि सेक्टर-39, तळोजा येथे एकूण 23,432 घरे प्रस्तावित आहेत.
सिडको संचालक मंडळातर्फे सदर महागृहनिर्माण योजनासाठी रु. 19,000 कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आल्याने योजनेची अंमलबजावणी नियोजित वेळेत व जलद गतीने करणे शक्य होणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न नजीकच्या काळात साकार होणार आहे.
सदर गृहनिर्माण योजनेतील 95,000 घरांपैकी 9,249 घरे ही नुकतीच पारदर्शक अशा संगणकीय सोडत पद्धतीद्वारे नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बांधकामाच्या दर्जाशी कुठेही तडजोड न करता हॉलमध्ये व्हिट्रिफाइड टाइल फ्लोरिंग, अन्य खोल्यांमध्ये सिरॅमिक टाइल फ्लोरिंग इ. सुविधा उपलब्ध करून देत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
बस व ट्रक टर्मिनल, रेल्वे स्थानक फोरकोर्ट एरियामध्ये घरे बांधण्यात आल्याने प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत होण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधींमध्ये वृद्धी हेही फायदे होणार आहेत.
आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे समाजातील विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांकरिता सातत्याने परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध देणे हे सिडकोच्या सर्वसमावेशक विकासाचे निदर्शक आहे.
व्यापारी सुविधा
सेवा क्षेत्र
नवी मुंबईतील पर्यावरण प्रदूषित करणारे रासायनिक कारखाने हळू-हळू बंद झाले. या शहराच्या विकासाबरोबर काही नव्या उद्योगांची सुरुवात झाली. शहराचा आर्थिक पाया खाजगी उद्योगांवर घातला गेला आहे. व्यवसाय-उद्योगांसाठी आवश्यक असणा-या पायाभूत सुविधा त्यांना परिपूर्ण रुपात उपलब्ध करून दिल्यामुळे अल्प कालावधीतच महत्वाचे उद्योग नवी मुंबईत स्थलांतरित झाले. त्यातील महत्वाची केंद्रें आहेत: वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार संकुल(एपीएमसी), घाऊक भाजीपाला तसेच फळ बाजार त्याचप्रमाणे कळंबोली येथील लोह आणि पोलाद बाजार यांसारख्या पारंपारिक उद्योगांबरोबरच आधुनिक जगाची ओळख बनलेले वाशी येथील माहिती तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क(आयआयपी) आणि सीबीडी बेलापूरमधील इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर.
घाऊक बाजारपेठ
मुंबईतील रहदारीवरील ताण दूर करण्याच्या उद्देशाने निर्मिलेल्या वाशी येथिल कृषी-उत्पन्न बाजार संकुलात १३ घाऊक कृषीउत्पन्न बाजार टप्प्याटप्प्याने स्थलांतरित करण्यात आले. या संकुलाच्या विकासाची सुरुवात १९९१ साली झाली तर १९९६ साली ते पूर्णपणे तयार झाले. व्यापा-यांची कार्यालये, दुकाने, गोदामे, विस्तृत लिलाव दालनांसह चार मजल्यांची मध्यवर्ती सुविधा इमारत, बँका, हॉटेल्स इ. सुविधा बाजार संकुलामध्ये आहेत.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजार संकुल आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी उत्पन्न बाजार संकुल आहे आणि यामुळेच नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण होत आहे. सकाळच्या वेळेस ह्या बाजार संकुल शेतकरी, विक्रेते, छोटे-मोठे खारेदिकर्ते आणि एजंट यांनी गजबजलेला असतो. संपूर्ण राज्यातून शेतकरी फळे व भाजीपाला मुंबई आणि नवी मुंबई मध्ये विकण्यासाठी येथे येतात. येथील अंदाज वार्षिक उलाढाल ६० दशकोटी रुपयांची आहे. सुमारे १ लक्ष व्यापारी तसेच या व्यवसायाशी संबधित कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
लोह-पोलाद बाजार संकुल, कळंबोली
कृषीउत्त्पन्न बाजाराप्रमाणे, लोह आणि पोलादाच्या घाऊक बाजारानेही, कळंबोली येथील लोह आणि पोलाद बाजार संकुलाच्या रुपात नवी मुंबईचा मार्ग धरला. हे संकुल ३०० हेक्टर क्षेत्रात विस्तारीत असून सुमारे ४०,००० रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. स्टील एथॉरिटी ऑफ इंडिया (सेल), टाटा आयर्न आणि स्टील कंपनी (टिस्को), सेन्ट्रल वेअर हौसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासह अन्य कंपन्यांच्या मोठ्या स्वरूपातील वखारीच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त सिडकोने सिमेंटच्या घाऊक बाजारासाठी १२ हेक्टर क्षेत्रफळाचे वेअरहाउस विकसित केले. ६ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड कापूस महामंडळ, सेन्ट्रल वेअर हौसिंग कर्पोरेशनकरीता ९ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड आणि फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाला १८ हेक्टर्सचा भूखंड उपलब्ध करून दिला आहे.
इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क (आयआयपी), वाशी
माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अपरिमित वाढ लक्षात घेऊन ज्या ठिकाणी या क्षेत्राच्या विकासाच्या शक्यता आहेत, अशी राज्यभरातील स्थळे महाराष्ट्र शासनाने निवडली. त्यापैकी वाशी हे या क्षेत्रास अनुकूल स्थळ. वाशी रेल्वे स्थानकावरील वाणिज्यिक संकुलात वसलेल्या इंटरनेशनल इन्फोटेक पार्कचे उदघाटन १४ जुने १९९८ रोजी संपन्न झाले. हे ठिकाण एसटीपीआय, व्हीएसएनएल, ३ आय इन्फोटेक, ट्रकमेल(इंडिया) प्रा.लि., सिफी, स्कायक्वाटर टेक्नॉलॉजिस लि., इंटर कनेक्टेड स्तॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, आणि असंख्य आयटी कंपन्यांचे माहेरघर झाले आहे.
वाणिज्यिक केंद्र अर्थात बेलापूर येथे वसलेले दुसरे आधुनिक माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणजे इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर. रेल्वे स्थानकासह विनिज्यिक संकुलात साकारलेले हे केंद्र अखंडित विद्युत पुरवठा, निवासी सुविधांचे सान्निध्य, हेल्थ क्लब, सुरेखीत व सुनियोजित परिषद सुविधा, उद्याने आणि बागा व प्रशस्थ पार्किंग अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण आहे. विप्रो, लॅब इंडिया इंस्ट्रुमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, शेल ट्रान्सफोर्स, ग्रीन पॉईंट टेक्नॉलॉजी सोल्युशन, सिएमएस सिक्योरिटी आणि अन्य महत्वाच्या औद्योगिक संस्थांची कार्यालये स्थित आहेत.
जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपी)
जवाहरलाल नेहरू पोर्ट हे बंदर २६ मे, १९८९ पासून अस्तित्वात आले आहे. जगातील १०० प्रमुख कंटेनर पोर्टसमध्ये जेएनपीचे नाव अग्र क्रमांकावर आहे. भारतातील पश्चिम किनारपट्टीच्या पोर्टचे ते केंद्रस्थान आहे. भारतातील सर्वात मोठ्या या कंटेनर यार्डातून भारतातील ६०% कंटेनर्सची वाहतूक होते. नवी मुंबईनजिक असलेले आणि नवी मुंबईचाच भाग आहे. नवी मुंबई शहरासाठी ते महत्वाचा रोजगाराचा महत्वाचा स्रोत आहे.
भौतिक सामाजिक-सांस्कृतिक सुविधा
नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक स्तरातील नागरिकांना निवासाची सोय होईल असे नियोजन करण्यात आले. सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व धर्मियांसाठी तसेच विविध समाज घटकांसाठी समाज-मंदिर, सांस्कृतिक केंद्र, शाळा, महाविद्यालये, इस्पितळे, धार्मिक स्थळे, मनोरंजन या उउद्देशासाठी पात्रता तपासून मान्यवर संस्थाना सिडकोने प्रत्येक नोडमध्ये अव्यावसायिक दराने जागा दिल्या आहेत.
नवी मुंबईकरांच्या सामाजिक- सांस्कृतिक गरजांची जाणीव आणि आकांक्षांना ओळखून वाशी येथे अत्याधुनिक आणि देखण्या 'विष्णुदास भावे नाट्यगृह'ची निर्मिती करण्यात आली. मराठी रंगभूमीचे प्रवर्तक कै. विष्णुदास भावे यांचे नाव नवी मुंबईतील रंगभूमीच्या उदयाला अत्यंत समर्पक ठरले. वाशीच्या केंद्रभागी ही वास्तू साकारण्यात आली आहे. अत्याधुनिक दर्जाचा आराखडा असणारे बहुउद्देशीय नाट्यगृहाच्या दोन मजल्यांच्या प्रेक्षागाराची आसनक्षमता १०७२ एवढी आहे.
नवी मुंबई महानगर प्रदेशातील मूळ रहिवासी असणारा समाज म्हणजे आगरी-कोळी. आव्हानात्मक दर्यावर्दी व्यवसाय करणा-या या समाजाची संस्कृतीही अत्यंत उत्स्फूर्त आणि चैतन्यशील म्हणून ओळखली जाते. संपन्न वारसा लाभलेल्या या समाजाच्या संस्कृतीची जपणूक आणि संवर्धन करण्याकरणे, समाजाला आदर्श ठरतील अशा उपक्रमांचे आयोजन करणे, त्यांच्यात सांस्कृतिक-सामाजिक मनोमीलन घडविणे यासाठी आगरी-कोळी संस्कृती भवनाची निर्मिती करण्यात आली आहे.
भारतातील लोककलेला आणि उदयोन्मुख कलांकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकानजिक कलाग्रामची निर्मिती करण्यात आली आहे. कला, खाद्यकृती आणि सांस्कृतिक उपक्रमांचे हे कायमस्वरूपी केंद्र बनले आहे. हस्तकलांप्रमाणेच विविध राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी लोककलेची ही पेठ पावसाळा वगळता नेहमी गजबजलेली असते. या उपक्रमाद्वारे लोककला-हस्तकलेच्या क्षेत्राला मदत होत असून, कला आणि कलाउत्पादनांच्या व्यवसायाकरिता कलावंत व खरेदीदार यांच्यात समन्वयही साधला जात आहे.
Navi Mumbai Surveys
सिडकोने नवी मुंबईतील कुटुंबांची नियत कालांतराने नियमित सर्वेक्षण केले आहे. १९७५, १९७९, १९८३, १९८७, १९९०, १९९५, २००५ आणि २०१० सालात अशी सर्वेक्षणे झाली आहेत. पहिल्या दोन दशकांमध्ये झालेली सर्वेक्षणे मुख्यत: नवी मुंबईतील गृहनिर्माणाची निकड लक्षात घेण्याच्या उद्देशाने आणि नगर विकासाच्या आगामी धोरणाच्या दिशेबाबत निर्णय करण्यासाठी केली गेली.
अ. क्र. | परिमाणे | १९९१ जनगणना | २००१ जनगणना | २०११ जनगणना |
---|---|---|---|---|
1 | लोकसंख्यावाढ | ११.४०% | १०.६२% | ८.६६% |
2 | जन्मस्थळ | महाराष्ट्र 59% | असमाविष्ट | महाराष्ट्र ७३.०४% |
3 | साक्षरता प्रमाण | ९४% पु.:असमाविष्ट /स्त्री:असमाविष्ट | 96% पु:असमाविष्ट / स्त्री:असमाविष्ट | 98% पु: ९९% /स्त्री: ९७% |
4 | पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर | १७.०७7% | २७% | ३४% |
5 | उच्चमाध्यमिकपर्यंत | ४२% | ५४% | असमाविष्ट |
6 | शिक्षणाचे माध्यम | इंग्रजी ६०% , मराठी २७% , हिंदी ०.१% | असमाविष्ट | इंग्रजी ७६% मराठी २१% हिंदी २% |
7 | सरासरी कुटुंब संख्या | ४.०१ | ४.०५ | ३.७ |
8 | कमावता सदस्य | 1.35 | असमाविष्ट | 1.3 |
9 | कुटुंबाचे उत्पन्न | रु. ४,७०८ | रु. ९.५४९ | रु. २४,६८६ |
10 | कुटुंबाचा खर्च | असमाविष्ट | असमाविष्ट | रु. १६,४९६ |
11 | वाहन मालकी | १०% | असमाविष्ट | ६४% |
ही सर्वेक्षणे वेगवेगळ्या संस्थांकडून जसे १९९० साली (सिडको), १९९५ (टीआयएसएस), २००५ आणि २०१० (किर्लोस्कर कन्सल्टंट्स) केली गेली. तरी नवी मुंबईच्या विकासाचे नेमके विश्लेषण असे या सर्वेक्षणांचे निकष हे सामायिक होते. १९९०, १९९५, २००५ आणि २०१० सालातील सर्वेक्षणाचे निष्कर्ष नवी मुंबईतील विकासासाठी सिडकोची स्थापना ज्यासाठी करण्यात आली होती त्या उद्देशाला अनुसरून सर्व क्षेत्रांत वाटचाल योग्य मार्गावर आहे दर्शविणारे होते.