सिडको गृहनिर्माण योजना : घरकुलांचे स्वप्न साकारणारी परंपरा

नगर नियोजन व विकास क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था, याबरोबरच नवी मुंबई क्षेत्रात सातत्याने समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी दर्जेदार घरांची निर्मिती करणारे नियोजन प्राधिकरण असाही सिडकोचा लौकिक आहे. नवी मुंबईसारखे जागतिक दर्जाचे शहर विकसित करण्याबरोबरच  सिडकोने या शहरात राज्यातील व देशाच्या अन्य भागांतील लोकांना वास्तव्य करण्याची संधी मिळावी म्हणून नवी मुंबईमध्ये आजपर्यंत विविध गृहनिर्माण योजना राबविल्या आहेत. सिडको महामंडळाने आपले गृहनिर्माण धोरण आखताना त्यामध्ये स्व-वित्त पुरवठा तत्त्व अंतर्भूत करून जमिनीचा मुख्यत्वे वापर हा समाजाच्या विविध घटकांकडून असलेल्या घरांची वाढती मागणी पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट समोर ठेवून सिडकोने आजवर नवी मुंबई क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांकरिता अनेक गृहनिर्माण योजना राबविल्या आहेत. या सर्व गृहनिर्माण योजनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून या योजना कमालीच्या यशस्वी ठरल्या.

सिडकोने आजवर बांधलेल्या 1,23,577 घरांपैकी 51% घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अल्प उत्पन्न गटासाठी, 26% घरे ही मध्यम उत्पन्न गटासाठी तर 23% घरे ही उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात आली आहेत. या आकडेवारीवरून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देणे हेच सिडकोच्या गृहनिर्माण धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे दिसून येते.

सिडकोतर्फे 1972 पासून राबविण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनांतर्गत घरे बांधताना तत्कालिन उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. सुरुवातीच्या बांधकामांमध्ये लोड बेअरिंग कॉम्पोझिट मॅझनरीसह ब्रिक वक्र आणि आरसीसी म्युलीयन तंत्रज्ञान व त्यानंतर नव्याने उदयास आलेल्या प्रिफॅब चॅनल स्लॅब, 3-एस सिपोरेक्स सिस्टीम, भूकंपरोधक तंत्रज्ञान इ. तंत्रज्ञानाचा  वापर सिडकोने आपल्या बांधकामांमध्ये केला.

सिडकोने बॉम्बे अर्बन डेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट (बीयुडीपी) 1, 2 आणि 3 अंतर्गत ऐरोली, कोपरखैरणे, खारघर, नेरूळ, कळंबोली आणि नवीन पनवेल येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता घरे बांधली. विविध उत्पन्न गटांकरिता सिडकोतर्फे राबविण्यात आलेल्या काही प्रमुख गृहनिर्माण योजना पुढील प्रमाणे :

 • आर्टिस्ट व्हिलेज
 • सीवूड्स इस्टेट
 • मिलेनिअम टॉवर्स
 • घरकुल
 • स्पाघेटी
 • घरौंदा
 • निवारा
 • सिम्प्लेक्स
 • वास्तुविहार व सेलिब्रेशन
 • उन्नती
 • व्हॅलीशिल्प
 • स्वप्नपूर्ती

 

15 हजार घरांची गृहनिर्माण योजना

या गृहनिर्माण योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांसाठी एकूण 14,838 घरे उपलब्ध करून देण्यात आली. त्यांपैकी 5262 घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर 9576 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही घरे 1 बीएचके (1 हॉल, 1 खोली, 1 स्वयंपाकघर) प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र निर्देशांक 25.81 चौ.मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र निर्देशांक 29.82 चौ.मी. इतका आहे. या गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 नोड्मध्ये गृहसंकुले साकारण्यात येत आहेत. उच्च दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या या गृहसंकुलांना भारतीय शास्त्रीय संगीतातील रांगांची नावे देण्याची अभिनव कल्पना राबविण्यात आली आहे.

95 हजार घरांची महागृहनिर्माण योजना

सिडकोतर्फे 95,000 घरांच्या भव्य गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येऊन या महागृहनिर्माण योजनेचा भूमिपूजन समारंभ दि. 18 डिसेंबर, 2018 रोजी मा. पंतप्रधनांच्या शुभहस्ते पार पडला. सदर गृहनिर्माण योजना ही ‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित आहे. या गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा नोड्सह विविध नोड्मधील बस डेपो, ट्रक टर्मिनल, रेल्वे स्थानक फोरकोर्ट एरिया परिसरामध्ये घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर गृहनिर्माण योजना ही एकूण 4 पॅकेजमध्ये साकारण्यात येणार आहे. पॅकेज-1 अंतर्गत तळोजा नोड्मधील सेक्टर-29, 31, 28ए, 36ए, 37 आणि पनवेल आंतरराज्य बस टर्मिनल परिसरात घरे बांधण्यात येणार आहेत. या पॅकेज अंतर्गत एकूण 20448 घरे प्रस्तावित आहेत. पॅकेज-2 अंतर्गत पनवेल बस टर्मिनल, खारघर बस टर्मिनल, कळंबोली बस डेपो, खारघर बस डेपो, वाशी ट्रक टर्मिनल, खारघर रेल्वे स्थानक आणि सेक्टर-44, खारघर येथे घरे बांधण्यात येणार आहेत. पॅकेज-2 अंतर्गत एकूण 21,564 घरे प्रस्तावित आहेत. पॅकेज-3 अंतर्गत सानपाडा रेल्वे स्थानक (नोड्ल बाजू), सानपाडा रेल्वे स्थानक (महामार्गकडील बाजू), जुईनगर रेल्वे स्थानक, मानसरोवर रेल्वे स्थानक, खांदेश्वर रेल्वे स्थानक, खांदेश्वर (खाडीकडील बाजू) आणि सेक्टर-1ए, तळोजा येथे एकूण 21,517 घरे बांधणे प्रस्तावित आहे. पॅकेज-4 अंतर्गत बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर रेल्वे स्थानक पूर्व व पश्चिम आणि सेक्टर-39, तळोजा येथे एकूण 23,432 घरे प्रस्तावित आहेत.

सिडको संचालक मंडळातर्फे सदर महागृहनिर्माण योजनासाठी रु. 19,000 कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आल्याने योजनेची अंमलबजावणी नियोजित वेळेत व जलद गतीने करणे शक्य होणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न नजीकच्या काळात साकार होणार आहे.

सदर गृहनिर्माण योजनेतील 95,000 घरांपैकी 9,249 घरे ही नुकतीच पारदर्शक अशा संगणकीय सोडत पद्धतीद्वारे नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बांधकामाच्या दर्जाशी कुठेही तडजोड न करता हॉलमध्ये व्हिट्रिफाइड टाइल फ्लोरिंग, अन्य खोल्यांमध्ये सिरॅमिक टाइल फ्लोरिंग इ. सुविधा उपलब्ध करून देत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

बस व ट्रक टर्मिनल, रेल्वे स्थानक फोरकोर्ट एरियामध्ये घरे बांधण्यात आल्याने प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत होण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधींमध्ये वृद्धी हेही फायदे होणार आहेत.

आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे समाजातील विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांकरिता सातत्याने परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध देणे हे सिडकोच्या सर्वसमावेशक विकासाचे निदर्शक आहे.