आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क

आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क

नवी मुंबईचे औदद्योगिक पटल नव्या रूपात परिवर्तित झाले. हवेचे प्रदूषण फैलावणारे उदद्योग हे हळूहळू बंद होऊ लागले. नवी मुंबईच्या स्थापनेसमयी या शहराचे आर्थिक चलनवलन हे मुख्यत: खासगी क्षेत्रातून रोजगार आणि कृषी उत्पादनांचा घाऊक व्यापार आणि प्रक्रियेशी निगडित उपक्रम, लोखंड व पोलाद गोदामे आणि घाऊक बाजारपेठ, बंदराशी संलग्न वाणिज्य आणि औदद्योगिक उपक्रम, तसेच जिल्हा व्यवसाय केंद्रे (डीसीबी) आणि नव विकसित मध्यवर्ती व्यापार जिल्हा (सीबीडी) येथे निवडक खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये, प्रशिक्षण तसेच संशोधन व विकास केंद्रे असे नियोजित होते. १९७०-७१ मध्ये सिडकोच्या स्थापनेसमयी शहराचा एकमेव आर्थिक स्रोत हा ठाणे-बेलापूर पट्ट्यातून निर्माण झालेल्या १६,००० औदद्योगिक नोकऱ्या हाच एकमेव होता; त्या काळी मुंबईतून कामगारांची ने-आण करण्यासाठी येथील कंपन्यांकडून वाहतुकीवर खूप मोठा खर्च केला जात होता.

तथापि माहिती आणि तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व व प्रस्थ लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने या उदद्योगाच्या वाढ आणि विकासाला पोषक ठरतील अशी काही क्षेत्रे निश्चित केली. याच पार्श्वभूमीवर १४ जून १९९८ रोजी वाशी येथे आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्कचे उद्घाटन करण्यात आले. हे पार्क अत्यंत समर्पक ठिकाणी वसलेले होते. वाशी रेल्वे स्थानक परिसरातील वाणिज्य संकुलातील ६ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा परिसर हा माहिती तंत्रज्ञान उद्यान (आयटीपी) आरक्षित करण्यात आला होता. या ठिकाणाहून व्हीएसएनएल, ह्यूझ इस्पात, एसटीपीआय, इंटरकनेक्टेड स्टॉक एक्सचेंज वगैरे सारख्या कंपन्यांचा कारभार सुरूही झाला होता. नव्या इन्फोटेक पार्कने सुमारे ५०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केला.