बेलापूर किल्ला सौंदर्यीकरण
ऐतिहासिक पार्श्वभूमी
नवी मुंबई परिक्षेत्रातील एकमेव ऐतिहासिक वास्तू म्हणजे बेलापूर किल्ला; जो आज पुरातन अवशेषांच्या रुपात अस्तित्वात आहे. जंजिराच्या सिद्दी लोकांनी हा भूप्रदेश पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यावर इ.स. १५६० ते १५७० दरम्यान या किल्ल्याची बांधणी केली. त्यानंतर पुढील २५० वर्षांत हा किल्ला सिद्यांकडून पुन्हा पोर्तुगीजांनी, पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी आणि मराठ्यांकडून ब्रिटीशांनी जिंकला होता.
हा किल्ला एके काळी शाबाज म्हणून ओळखलं जात असे. जवळपास असलेलं शहाबाज गाव हे या किल्ल्याच्या जुन्या नावाची साक्ष देते. या किल्ल्याचे बेलापूर किल्ला असे नामकरण चिमाजी आप्पा यांनी केले. बाजीराव पेशवे यांचे कनिष्ठ बंधू चिमाजी आप्पा यांनी इ.स. १७३७ मध्ये पोर्तुगीजांचा पराभव करून मराठ्यांचे निशाण या किल्ल्यावर फडकवले. या किल्ल्याची मोहीम यशस्वी झाल्यास नजिकच्या अमृतेश्वर मंदिरातील भगवान शंकराच्या मूर्तीला बेलाचा हार अर्पण करण्याची शपथ चिमाजी आप्पा यांनी वाहिली होती. विजयानंतर शंकराला प्रिय असलेल्या बेल वृक्षाच्या नावावरून या किल्ल्याला बेलापूर नाव त्यांनी दिले.
हा किल्ला, ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रे यांनी इ. स. २३ जून १८१७ रोजी जिंकेपर्यंत, मराठा राजवटीच्या अंमलाखाली होता. या लढाईत या किल्ल्याची मोठ्याप्रमाणात पडझड झाली आणि ब्रिटीश अमदानीत मुंबई इलाख्याचा विस्तार झाल्याने किल्ल्याचे युद्धनीतीतील महत्व राहिले नाही.
स्थळ आणि प्रकल्प
हा किल्ला नवी मुंबईतील आधुनिक स्मारक असलेल्या महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या समोर स्थित आहे. येथून या शहरातील आदर्श असा अंतर्गत द्रुतमार्ग, पाम बीच मार्ग सुरु होतो. किल्ल्याचा परिसर सुमारे ५ एकरावर विस्तारला आहे. हा भूप्रदेश सिडकोच्या अखत्यारीत येतो. या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि सौन्दार्यीकरण करण्याचा महात्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. लोकेश चंद्र यांनी १६ जून २०१९ रोजी या प्रकल्पाचे प्रतिकात्मकरित्या उद्घाटन केले. किल्ल्याच्या भग्नावशेषांचे पुनरुज्जीवन करण्यात करण्याचा या प्रकल्पात अंतर्भाव आहे. 'किमया आर्किटेक्टस्' या ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन करण्याचा अनुभव असलेल्या स्थापत्य तंत्रज्ञानातील ख्यातनाम संस्थेला सिडकोने या प्रकल्पाचे काम दिले आहे. प्रकल्पाचा अंदाजे खर्च १७ कोटी रुपये एवढं आहे.
भारताच्या गौरवी इतिहासाची पाने उलगडणारा हा प्रकल्प तरुण पिढीसाठी शैक्षणिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरेल. भारतीय नाविक दलाचे (आरमार) जनकत्व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाते. हिंदवी स्वराज्याच्या सीमा सागरी बाजूने अधिक नाजूक असल्याने राज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी सागर किनारे संरक्षित केले होते. मराठा राजवटीतील बहुतेक किल्ले सागर किनारी उभारले गेले आहेत. बेलापूर किल्ला हा त्यापैकीच एक असून तो जलदुर्ग प्रकारात त्याची (सागरी किल्ला) गणना होते, यास्तव हा ऐतिहासिक वारासा जतन करणे गरजेचे आहे.
पुनर्रचना
इतिहास पुनरुज्जीवित करण्यासाठी किल्ल्याच्या सद्यस्थितीतील भग्नावशेषांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी ऐतिहासिक वास्तुशैलीचा अवलंब 'किमया आर्किटेक्टस्' करणार आहेत. किल्ल्याचा बुरुज पुनर्स्थापित करून त्याचे रुपांतर परिसर न्याहाळण्याच्या मनोऱ्यात करण्यात येईल. पुनर्रचनेत या परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल. किल्ल्याच्या परिसराचे नैसर्गिक रूप अबाधित राखून येथील जैव-विविधता जपण्यात येईल. वाहन प्रदूषणावर अंकुश राखण्यासाठी विजेवर चालणारी वाहनेच तेथे चालविली जातील.
सौंदर्यीकरण
पर्यटन स्थळ आणि सामाजिक-सांस्कृतिक घटनाचे महत्वाचे केंद्र म्हणून किल्ल्याचा विकास करण्यात येणार आहे. प्रवेश परिसरात प्रवेशिका खिडकी, विश्राम कक्ष, वास्तुभांडार आदि पर्यटक सुविधा असतील. प्रवेशद्वाराजवळच किल्ल्यावर जाण्यासाठी हलकीशी चढण तयार करण्यात येईल. बुरुजाच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण बहु-उद्देशीय प्रयोगमंच (अॅम्फीथिएटर) आणि खुला रंगमंच यांची रचना करण्याचे नियोजित आहे. या सर्व सुविधांमुळे या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षणिक सहल ऐतिहासिक फेरफटका असे कार्यक्रम आयोजित करणे सोयीचे जाणार आहे.
मुख्य वैशिष्ट्ये
- ध्वनी-प्रकाश सादरीकरणातून किल्ल्याचे कथन
- पर्यटन स्थळ, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र
- मराठा आरमाराचे गौरव उलगडणारे वस्तुसंग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र
- वाहनतळ, अल्पोहार क्षेत्र, बहु-उद्देशीय प्रयोगमंच, खुला रंगमंच, बगीचा आणि कारंजे