सेन्ट्रल पार्क, खारघर
मूळ निसर्गरम्य पार्श्वभूमी व उच्च दर्जाचे स्थापत्य यांचा कल्पकतेने मेळ साधत सिडकोतर्फे नागरिकांना उच्च दर्जाच्या सांस्कृतिक सुविधा देण्याच्या उद्देशाने सेंट्रल पार्क उद्यान विकसित करण्यात आले आहे. लंडन येथील हाइड पार्क आणि न्यूयॉर्क येथील सेंट्रल पार्क यांच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उद्यान हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सर्वांत मोठा नोड् व मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असणाऱ्या खारघर येथील मध्यवर्ती जागा सेंट्रल पार्क विकसित करण्याकरिता निश्चित करण्यात आली.
खारघर येथील हिरव्या डोंगररांगा आणि खाडी दरम्यान विकसित करण्यात आलेल्या सेंट्रल पार्क मैदानातून डोंगरांकडून खाडीकडे वाहत जाणारे निर्झर आणि त्यांभोवतीची वृक्षराजी यांचा अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आल्याने सेंट्रल पार्क निसर्गसौंदर्याने समृद्ध आहे. पहिल्या टप्प्यात सेक्टर-23 आणि दुसऱ्या टप्प्यात सेक्टर-24 आणि 25 मध्ये सेंट्रल पार्क प्रकल्प विकसित करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे उद्घाटन 23 जानेवारी, 2010 रोजी सेंट्रल पार्कमधील ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई फेस्टिव्हलमधील संगीतकार प्रितम यांच्या सांगितीक कार्यक्रमाद्वारे करण्यात आले तर 25 जानेवारी, 2010 रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रकल्पाचे औपचारिकरीत्या उद्घाटन संपन्न झाले. औपचारिक उद्घाटनानंतर 26 जानेवारी, 2010 रोजी ॲम्फी थिएटरमध्ये गायक, संगीतकार व अभिनेते सोनू निगम यांच्या संगीतविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.